एकाच सोफ्यावर दानवे–सत्तार! खुमासदार संवादाने लग्नमंडप गाजला

एकाच सोफ्यावर दानवे–सत्तार! खुमासदार संवादाने लग्नमंडप गाजला
एकाच सोफ्यावर दानवे–सत्तार! खुमासदार संवादाने लग्नमंडप गाजला

महाराष्ट्र वाणी 

भोकरदन (जालना) प्रतिनिधी दि २७ :- राजकारणात कायमचे वैर नसते, याचा प्रत्यय शुक्रवारी (दि. २७) लाडगाव येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात आला. एकमेकांवर सातत्याने टीका करणारे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे यावेळी मात्र एकाच सोफ्यावर हास्य-विनोद करताना दिसले.

💍 साखरपुड्याचे थेट लग्नात रूपांतर!

शासकीय कंत्राटदार सोमनाथ हराळ यांचे चिरंजीव दादाराव आणि भरत घोरपडे यांची कन्या सुषमा यांचा साखरपुडा आदिती लॉन्स येथे सुरू होता. कार्यक्रमाला मोठी गर्दी पाहून दानवे यांनी मिश्किलपणे,

“इतकी गर्दी जमलीच आहे, तर आत्ताच लग्न लावून टाकूया!” असा प्रस्ताव मांडला.

क्षणात दोन्ही कुटुंबीयांनी संमती दिली आणि साखरपुड्याचा कार्यक्रम थेट विवाह सोहळ्यात बदलला.

😄 सत्तारांचा टोला, दानवेंचे प्रत्युत्तर!

वधू-वरांना शुभेच्छा देताना अब्दुल सत्तार यांनी दानवेंना टोला लगावला.

“दानवे साहेबांनी आज आयुष्यात पहिल्यांदाच एक चांगलं काम केलंय – लग्न लावून दिलं!”

असे म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला.

त्यावर दानवे यांनीही क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले –

“सत्तार साहेबांनी मला चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदन केलं, धन्यवाद!

पण मला आठवतंय, मी अनेक चांगली कामं केलीत… मात्र सत्तार साहेबांनी एकही चांगलं काम केल्याचं आठवत नाही!”

या खणखणीत उत्तरावर संपूर्ण मांडवात एकच हास्यकल्लोळ झाला. स्वतः सत्तारही हसू आवरू शकले नाहीत.

🤝 कटुतेवर पडदा

विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच ‘गोल टोपी’ आणि ‘बोगस मतदान’ आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष झाला होता. मात्र, लग्नमंडपात राजकारण बाजूला ठेवत त्यांनी आपुलकीने संवाद साधला. वधू-वरांसोबत फोटो काढून दोघेही आपापल्या मार्गाने निघाले, पण त्यांची ही राजकीय जुगलबंदी आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

✍️ राजकारणात शब्दांचे युद्ध असते, पण लग्नमंडपात मात्र हास्याचेच वर्चस्व!