उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबरला

‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ विषयावर परिसंवादाचे आयोजन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबरला

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि ‘दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता जालना रोडवरील कॅम्ब्रिज चौक मैदान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत, तर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच जलसंधारण, जलसुरक्षा आणि दुष्काळ निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय, ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या यशोगाथा यावेळी मांडण्यात येणार असून, सन २०२५-२६ या वर्षातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, जलसुरक्षा आणि दुष्काळमुक्त समृद्ध गावांची निर्मिती या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सोहळ्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित