इंटर कॉलेज बॉक्सिंग स्पर्धेत इकरा कॉलेजची शानदार कामगिरी; हसीब शेखला सुवर्णपदक
महाराष्ट्र वाणी
जळगाव, दि. २० :- नूतन मराठा कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटर कॉलेज बॉक्सिंग टूर्नामेंटमध्ये इकरा एच. जे. थीम कॉलेजच्या बॉक्सर्सनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या स्पर्धेत इकरा कॉलेजच्या तीन खेळाडूंनी विविध वजनगटांत सहभाग घेतला. अमजद खान याने ४५ किलो वजनगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिसरा क्रमांक मिळवला. हसीब शेख याने ८५ किलो वजनगटात दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर साहिल शेख याने ९० किलो वजनगटातील अटीतटीच्या लढतीत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.
या तिन्ही खेळाडूंच्या यशामागे कॉलेजचे फिजिकल डायरेक्टर डॉ. चांद खान यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बॉक्सर्सचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार आणि व्यवस्थापनानेही खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
इकरा कॉलेजच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.