आमदार अब्दुल सत्तारांच्या प्रयत्नांना यश; अंभईत वीज उपकेंद्राची क्षमता दुप्पट
महाराष्ट्र दाणी
सिल्लोड /अंभई दि १४ :- सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. अंभई (ता. सिल्लोड) येथील वीज उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
अंभई उपकेंद्राची यापूर्वीची क्षमता १० एमव्हीए होती. अतिरिक्त १० एमव्हीए ट्रान्सफॉर्मर बसल्यानंतर या उपकेंद्राची एकूण क्षमता २० एमव्हीए होणार आहे. त्यामुळे परिसरातील वीज वितरण व्यवस्थेला मोठी ताकद मिळणार आहे.
वीज क्षमतेत दुप्पट वाढ झाल्याने शेतकऱ्यांना शेतीपंपांसाठी अधिक स्थिर व सुरळीत वीजपुरवठा, तर घरगुती ग्राहकांना वीजपुरवठ्यातील अडथळे कमी होण्यास मदत होणार आहे. वाढता वीजभार आणि भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता हे काम ग्रामीण भागासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, वाढता वीजभार आणि शेतीसाठी विजेची वाढती गरज लक्षात घेऊन वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे शेती, छोटे व्यवसाय, उद्योग आणि घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील वीज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी यापुढेही आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.