आदर्श महिला पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी अब्दुल सत्तार मैदानात; अडकलेल्या ठेवी मिळवून देण्यासाठी सहकारमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड २८ ऑगस्ट :- आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, यासाठी ठेवीदारांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. सिल्लोड येथील आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या भेटीत ज्येष्ठ नागरिकांसह अनेक ठेवीदार उपस्थित होते.
पतसंस्थेतील ठेवी अडकल्यामुळे आजारपणावरील उपचार, औषधोपचारांचा खर्च तसेच कौटुंबिक गरजा भागविताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ठेवीदारांनी आमदार सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी अडकलेल्या ठेवी शक्य तितक्या लवकर मिळाव्यात, अशी मागणी केली.
ठेवीदारांच्या अडचणींचे गांभीर्य लक्षात घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून या प्रकरणातील परिस्थिती जाणून घेतली. तसेच पुढील कार्यवाहीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
दरम्यान, आजारपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ठेवीदारांना मानवतेच्या दृष्टिकोनातून किमान काही रक्कम तातडीने उपलब्ध करून देता येईल का, याबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे आमदार सत्तार यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.
यासोबतच सर्व ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी ठेवीदारांना दिले. हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याची भूमिका आमदार सत्तार यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान अहमद खान, हरिश्चंद्र सपकाळ, संतराम मगर, रामभाऊ मालोदे, देवराव गाडेकर, छायाताई चव्हाण, उज्वलाताई पवार, संगीताताई जाधव यांच्यासह अनेक ठेवीदार उपस्थित होते.