अवकाळीच्या फटक्याने शेतकरी हवालदिल; पिक विमा तात्काळ द्या – आमदार सतीश चव्हाण यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- जिल्ह्यातील गंगापूर व खुलताबाद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सन 2025-26 च्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा रक्कम मिळालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतीश चव्हाण यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची काल दिनांक १५ एप्रील रोजी मंत्रालयात भेट घेऊन त्वरित विमा रक्कम देण्याची मागणी केली.
तहसील कार्यालयामार्फत नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, पिक कापणी प्रयोगांचे अंतिम अहवालही सादर झाले आहेत. तरीही संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळालेली नाही, ही बाब आमदार चव्हाण यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर १७,००० रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार तात्काळ मदत देण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, पैठण विधानसभा अध्यक्ष विनोद तांबे आदी उपस्थित होते.
पिकांचं नुकसान झालंय, आता किमान हक्काचा विमा तरी वेळेत मिळावा—हीच शेतकऱ्यांची आर्त हाक!