अल्पसंख्यांक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांत उमेदवारी द्यावी – खा. इमरान प्रतापगडी यांना निवेदन

अल्पसंख्यांक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांत उमेदवारी द्यावी – खा. इमरान प्रतापगडी यांना निवेदन
अल्पसंख्यांक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांत उमेदवारी द्यावी – खा. इमरान प्रतापगडी यांना निवेदन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- अल्पसंख्यांक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक काँग्रेसच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इमरान प्रतापगडी यांना निवेदन सादर करण्यात आले.

आज दि. १४ डिसेंबर रोजी दिल्ली येथे खासदार इमरान प्रतापगडी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अल्पसंख्यांक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. तळागाळात पक्ष मजबूत करणाऱ्या, संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

निवेदनात जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अल्पसंख्यांक समाजातील सक्षम, अनुभवी व जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे सामाजिक समतोल राखला जाईल आणि काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला अधिक बळ मिळेल, असे नमूद करण्यात आले.

या वेळी अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय सचिव नासेर नजीरखान, अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, अल्पसंख्यांक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोइन इनामदार, अहमद चाऊस, आमेर अब्दुल सलीम, इरफान पठाण, सय्यद फराज आबेदी, विकास खन्ना, सोनू शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

खा. इमरान प्रतापगडी यांनी निवेदनाची दखल घेत संघटनेच्या भावना वरिष्ठ पातळीवर मांडण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

— संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना संधी देण्याची ठाम मागणी