अंभईच्या भिकाभाऊ बावस्कर यांच्या शेतवस्तीवर आमदार अब्दुल सत्तारांची दिवाळी; शेतकरी कुटुंबाला दिला मायेचा आधार!

अंभईच्या भिकाभाऊ बावस्कर यांच्या शेतवस्तीवर आमदार अब्दुल सत्तारांची दिवाळी; शेतकरी कुटुंबाला दिला मायेचा आधार!
अंभईच्या भिकाभाऊ बावस्कर यांच्या शेतवस्तीवर आमदार अब्दुल सत्तारांची दिवाळी; शेतकरी कुटुंबाला दिला मायेचा आधार!

सिल्लोड (प्रतिनिधी) दि. ८ :- दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, यंदा दुष्काळाच्या संकटामुळे अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी अनोखा उपक्रम राबविला. सिल्लोड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त आणि गरजू शेतकरी कुटुंबांच्या शेतवस्तीवर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत त्यांनी माणुसकीचा दीप प्रज्वलित केला.

या उपक्रमांतर्गत आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई येथील रानमळा शिवारात सर्वसामान्य शेतकरी श्री. भिकाभाऊ सांडू बावस्कर यांच्या शेतवस्तीवरील निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी बावस्कर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची आस्थेने विचारपूस केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

याप्रसंगी कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन, मुलांना सायकल, तसेच किराणा किट, दिवाळीचा फराळ आणि दैनंदिन गरजेचे साहित्य भेट देण्यात आले. या भेटवस्तूंमुळे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. केवळ भेटवस्तू देऊन औपचारिकता न करता शेतकरी कुटुंबाच्या अडचणी समजून घेत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्यावर आमदार सत्तार यांनी भर दिला.

संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर दिवाळी!

विशेष म्हणजे, आमदार अब्दुल सत्तार यांनी केवळ एका कुटुंबापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता संपूर्ण सिल्लोड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त आणि गरजू शेतकरी कुटुंबांच्या शेतात व घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. सणाच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांना आधार देत त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाचे काही क्षण देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला. राजकारणापलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या या प्रयत्नाची परिसरात चर्चा होत आहे.

यावेळी दामू अण्णा गव्हाणे, रईस देशमुख, गुड्डू अप्पा नगरे, मोहसीन देशमुख, सयाजीराव वाघ, इमरान उर्फ गुड्डू, रितेश जैस्वाल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दुःखाच्या अंधारात आनंदाचा एक दिवा पेटविण्याचा प्रयत्न म्हणजेच यंदाची ही शेतकऱ्यांसोबतची दिवाळी ठरली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित