स्वातंत्र्यदिन पूर्वतयारीचा ‘विभागीय आयुक्ता’कडून आढावा

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11 :- भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य ध्वजारोहण समारंभासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर आयुक्त डॉ.अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, नगर प्रशासन विभागचे उपायुक्त देविदास टेकाळे यांच्यासह महसूल, पोलीस, महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, माहिती विभाग आदीसह विविध कार्यालयांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपस्थितांसाठी मंडप उभारणी करणे, मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळी स्वच्छता करणे, रंगरंगोटी, कुंड्या ठेवणे, पताका लावणे, गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांना उभे राहण्यासाठी चौकट रंगविणे, ध्वज स्तंभ, राष्ट्रध्वज, ध्वजाला मानवंदना, पोलीस पथकांची, बँड पथकाची नियुक्ती आदी बाबींचा आढावा घेत सोपविण्यात आलेली कामे समन्वाने वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.पापळकर यांनी दिले.
अपर आयुक्त श्री.परदेशी यांनी विभागनिहाय देण्यात आलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.