स्वातंत्र्य दिनी वेरुळमध्ये भाविक-पर्यटकांचा महापुर; पावसातही पोलिसांची ‘तारेवरची कसरत’
महाराष्ट्र वाणी न्युज
खुलताबाद दि १५ :– स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक वेरुळ लेणी आणि श्री घृष्णेश्वर मंदिर परिसर मंगळवारी (१५ ऑगस्ट) भाविक-पर्यटकांच्या महापूराने गजबजला. सलग सुट्ट्यांचा लाभ घेत देशभरातून आलेल्या पर्यटकांनी धार्मिक व ऐतिहासिक स्थळांकडे मोर्चा वळवला.
दुपारपर्यंत हजारो भाविकांनी लेणी व मंदिराचे दर्शन घेतले. भर पावसात हिरवाईने नटलेला परिसर आणि रिमझिम सरींनी पर्यटकांच्या आनंदात भर घातली. मात्र, वाढत्या गर्दीमुळे वेरुळ मार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना पावसात भिजतच रस्त्यावर उतरून वाहनांच्या रांगा फोडाव्या लागल्या. अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर मुसळधार सरींमध्ये ‘तारेवरची कसरत’ करत राहिले.
गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात होता, तरीही वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. तरीही भाविक-पर्यटकांनी संयम राखत दर्शनाचा आनंद घेतला.
दरम्यान, मंदिर परिसरात पसरलेल्या कचऱ्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. दिवसभर वेरुळ परिसरात उत्साह, गर्दी आणि पावसाचा मिलाफ अनुभवायला मिळाला.