सुरतहून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन गुन्ह्यांतील फरार आरोपीसह सप्लायर अटकेत

सुरतहून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन गुन्ह्यांतील फरार आरोपीसह सप्लायर अटकेत

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ११ :- राज्यात वाढत्या अवैध ड्रग्स व्यवहारांवर आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई करत तीन गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी आणि त्याला ड्रग्स पुरवठा करणाऱ्या सप्लायरला गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने ही कारवाई केली असून, आरोपी अदनान कापडिया (वय 29, रा. सुरत) याला ९ एप्रिल 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत अवैधरित्या औषधी पुरवठा करणारा धीरुभाई लाठिया (वय 60, रा. सुरत) यालाही अटक करण्यात आली.

या दोघांविरुद्ध छावणी, बेगमपुरा आणि सातारा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर केले असता दोघांना १५ एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली आहे.

तपासात उघड झाले की, अदनान कापडिया हा छत्रपती संभाजीनगरमधील ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात होता. यापूर्वी तो मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. तर धीरुभाई लाठिया हा कागदोपत्री मेडिकल डिस्ट्रीब्युशन एजन्सी चालवत असला तरी प्रत्यक्षात सुरत येथून अवैध औषधांचा पुरवठा करत होता. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून विविध एजन्सींचे शिक्के, पावत्या आणि संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उप महानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि पोलीस उप अधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या भागांत कुठेही अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा तस्करी होत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

👉 ड्रग्सविरोधी लढ्यात पोलिसांचा मोठा घाव; आता शहरात अवैध रॅकेट्सना बसणार आळा!