सिल्लोड – सोयगावमधील प्रलंबित कर्जप्रकरणे मार्गी लावणार; आमदार अब्दुल सत्तारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी

सिल्लोड – सोयगावमधील प्रलंबित कर्जप्रकरणे मार्गी लावणार; आमदार अब्दुल सत्तारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
सिल्लोड – सोयगावमधील प्रलंबित कर्जप्रकरणे मार्गी लावणार; आमदार अब्दुल सत्तारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र वाणी

मुंबई (प्रतिनिधी) सिल्लोड दि १४ :– सोयगाव मतदारसंघातील मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत प्रलंबित कर्ज वितरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुंबई येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक विकास मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

यावेळी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळावर व्यवस्थापक पद रिक्त असल्याने अनेक लाभार्थ्यांची कर्ज वितरण प्रक्रिया रखडल्याचा मुद्दा आमदार सत्तार यांनी उपस्थित केला. व्यवस्थापक नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, मंजूर झालेल्या अनेक कर्ज प्रकरणांना अद्याप अंतिम मंजुरी आणि वितरण मिळालेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील युवक, लघुउद्योजक आणि अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असल्याचे सांगत, तातडीने व्यवस्थापकाची नियुक्ती करून प्रलंबित कर्जप्रकरणे लवकर निकाली काढावीत, अशी मागणी आमदार सत्तार यांनी केली.

या विषयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. प्रलंबित कर्ज वितरण प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या बैठकीमुळे सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातील अनेक प्रलंबित लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

“प्रलंबित कर्जप्रकरणे मार्गी लागल्यास अनेक युवकांना नव्याने व्यवसाय उभारण्याची संधी मिळणार आहे.”