सिल्लोड-सोयगावच्या प्रशासकीय व स्थानिक समस्यांवर अब्दुल सत्तारांची महसूल मंत्र्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई (सिल्लोड)दि १७ जुलै :- सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील विविध प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी व स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात सविस्तर चर्चा केली. यावेळी सिल्लोड व सोयगाव तहसील कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीपासून ते विविध नागरी समस्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली.
या चर्चेच्या दरम्यान आमदार सत्तार यांनी पुढील महत्त्वाचे विषय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले :
सिल्लोड व सोयगाव तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरणे
सिल्लोड तालुक्यातील काही गावांचा डोंगरी भागात समावेश करणे
प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे व प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे
सोयगावमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास गती देणे
अजिंठा येथे मंजूर अप्पर तहसील कार्यालय प्रत्यक्ष सुरू करणे
मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी भवनासाठी निधी उपलब्ध करून देणे
घरकुल मंजुरीसोबतच गायरान मधून बेघरांना भूखंड उपलब्ध करून देणे
गुंठेवारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे
स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान या स्थळांची महसूल अभिलेखात नोंद घेणे
सीमा भागातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी महसुली हद्द वाढवणे
जालना-जळगाव रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या सिल्लोड शहरातील भागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देणे
अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोबदला देणे
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना शासकीय सेवेत समावेश
संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना दरमहा अनुदान खात्यात वर्ग करणे
गावठाण व गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना भोगवटादार म्हणून नोंदवणे
या सर्व विषयांवर सखोल चर्चा झाल्यानंतर आमदार सत्तार यांनी एक अधिकृत पत्र महसूल मंत्री ना. बावनकुळे यांना सुपूर्द केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, ना. बावनकुळे यांनी संबंधित विभागांना सूचना देण्याचे आश्वासन दिले असून, हे विषय प्राधान्याने मार्गी लावण्याबाबत त्वरित पावले उचलण्याचे संकेत दिले.
शेवट गाठू या आपल्या हक्काच्या विकासाची!