सलमान खान @ 60: स्टारडमच्या शिखरावर, पण वैयक्तिक आयुष्यात अपूर्णतेची खंत
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २७ :- हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सलमान खान आज, २७ डिसेंबर रोजी, आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. अपार यश, लोकप्रियता आणि संपत्ती असूनही सलमान खानच्या आयुष्यात अजूनही एक इच्छा अपूर्ण असल्याची भावना तो अनेकदा व्यक्त करत आला आहे. ही इच्छा म्हणजे स्वतःचं कुटुंब आणि वडील होण्याचं स्वप्न.
सलमान खान – हे नाव उच्चारताच यश, स्टारडम आणि प्रभाव यांची झलक समोर येते. ‘दबंग’ खानने आपल्या मेहनतीच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत अढळ स्थान निर्माण केलं आहे. ज्याच्यावर सलमानचा आशीर्वाद असतो, त्याचं करिअर उजळतं, असं इंडस्ट्रीत मानलं जातं. इतकंच नाही तर सलमानच्या प्रभावामुळे अनेक जण त्यांच्याशी वाद घ्यायलाही कचरतात.
व्यावसायिक आयुष्यात सलमानने सर्व काही मिळवलं आहे. आलिशान बंगल्यांपासून फार्महाऊसपर्यंत, महागड्या गाड्यांपासून लक्झरी आयुष्यापर्यंत सर्व सुखसोयी त्यांच्या दिमतीला आहेत. मात्र, वैयक्तिक आयुष्यात ते स्वतःला अनेकदा एकटं असल्याचं मान्य करतात.
सलमान खानच्या आयुष्यात अनेक प्रेमप्रकरणं आली. काही नाती लग्नापर्यंत पोहोचली, मात्र विविध कारणांमुळे ती यशस्वी ठरली नाहीत. याच पार्श्वभूमीवर सलमानने यापूर्वी सिंगल फादर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरोगसी किंवा दत्तक प्रक्रियेच्या माध्यमातून वडील होण्याचा विचार त्यांनी खुलेपणाने मांडला होता.
आज वयाच्या ६०व्या वर्षीही सलमान खानचा तो विचार चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. स्टारडमच्या शिखरावर असलेला हा अभिनेता वैयक्तिक आयुष्यातील ही पोकळी कधी भरून काढणार, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
✍️ स्टारडम भरभराटीत असलं, तरी सलमान खानच्या आयुष्यातील ही इच्छा कधी पूर्ण होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे…