संभाजीनगर-मुंबई वंदे भारत लवकरच? – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून सकारात्मक संकेत
महाराष्ट्र वाणी न्युज
नवी दिल्ली दि १ ऑगस्ट :– महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची राज्यातील अनेक खासदारांनी भेट घेतली. या शिष्टमंडळात खासदार डॉ. भागवत कराड, डॉ. शिवाजी कालगे, अॅड. उज्वल निकम, डॉ. कल्याण काळे, बलवंत वानखेडे आणि अॅड. अतुल कराड यांचा समावेश होता.
या भेटीत छत्रपती संभाजीनगर-परभणी-इटारसी-नागपूर या महत्त्वपूर्ण चौपदरीकरण प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.
याच बैठकीत डॉ. भागवत कराड यांनी संभाजीनगर ते मुंबई दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे मांडली. यावर प्रतिसाद देताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या नवीन वंदे भारत लॉटमध्ये ही ट्रेन देण्याचे मान्य केल्याची माहिती मिळते.
दरम्यान, या भेटीत इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांवरही चर्चा झाली असून, त्या संदर्भातील सविस्तर माहिती डॉ. भागवत कराड हे रविवारी पत्रकार परिषदेत देणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी ठरणार आहे.