"शेवटी न्याय मिळाला!" – केएसटी शाळेतील 'त्या ८०' विद्यार्थ्यांना एलसी वाटप; उपशिक्षणाधिकारी भावूक
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव--नशिराबाद २८ जून :- दहावी उत्तीर्ण केएसटी उर्दू शाळेतील ८० विद्यार्थ्यांना अखेर शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांच्या स्वाक्षरीने वितरित करण्यात आला. दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख, नदीम मलिक, मतीन पटेल, रहीम पटेल, अनिस शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण मार्गदर्शन करताना भावुक झाले. "ज्या शाळेत २५ वर्षे सेवा दिली, त्या ठिकाणी आज कुलूप तोडून तपासणी होणं, ही वेदनादायक गोष्ट आहे," असे म्हणताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी गावकऱ्यांचे व एकता संघटनेचे आभार मानत सांगितले की, "नशिराबादशी थेट संबंध नसतानाही नागरिकांनी सहकार्य केले आणि आम्हाला काम करु दिलं, त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागला."
एकता संघटनेने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे विशेष आभार मानले. संघटनेचे फारुक शेख म्हणाले, "या विषयाचा अधिकार क्षेत्रात नसतानाही त्यांनी स्वतः पुढाकार घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले."
या निर्णयानंतर नशिराबादमध्ये एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या पालकांना एलसी देताना गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, खलील शेख, फारुक शेख, रहीम पटेल, नदीम मलिक, मतीन पटेल, अनिस शहा आदी उपस्थित.