शिवसेनेच्या गढाला भाजपचा सुरुंग! उबाठा गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य भाजपमध्ये दाखल

शिवसेनेच्या गढाला भाजपचा सुरुंग! उबाठा गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य भाजपमध्ये दाखल
शिवसेनेच्या गढाला भाजपचा सुरुंग! उबाठा गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :-     शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा छत्रपती संभाजीनगर शहराचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी आज मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला खासदार डॉ. भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे तसेच माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची उपस्थिती होती.

या पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील भाजपचे संघटन अधिक बळकट होणार असल्याचे संकेत मिळत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

शिवसेना फुटल्यानंतर उबाठा आणि शिंदे अशा दोन गटांत विभागणी झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवसेनेचे माजी महापौर, नगरसेवक व अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत वेगवेगळे राजकीय मार्ग स्वीकारले. काही शिंदे गटात गेले, तर काही थेट भाजपमध्ये दाखल झाले.

सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यावेळी नेमके कोणाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 शिवसेनेचा गढ ढासळणार की पुन्हा उभा राहणार? आगामी निवडणूक निकालच या राजकीय धक्क्याचा खरा हिशोब मांडणार आहे!