“वंचित घटक सत्तेत आल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत” – अॅड. प्रकाश आंबेडकर

“वंचित घटक सत्तेत आल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत” – अॅड. प्रकाश आंबेडकर
“वंचित घटक सत्तेत आल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत” – अॅड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३० :- “वंचित घटकांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित समाजाने एकजुटीने सत्ता मिळवणे अत्यावश्यक आहे. सत्ता मिळाल्याशिवाय या समस्या कधीच सुटणार नाहीत. प्रस्थापित राजकारण्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली असून, सध्याचे सरकार सत्तेपासून दूर करण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

दिनांक २९ ऑगस्ट रोजी हज हाऊस येथील सभागृहात वंचित आघाडीचे प्रवक्ते तय्यब जफर यांच्या उपस्थितीत “शतरंज-ए-हयात” या उर्दू पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, “अल्पसंख्याक समाजावरील अन्याय आणि अत्याचार सातत्याने वाढत आहेत. संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माॅब लिंचिंगच्या घटनांत निष्पाप लोकांचा बळी घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीत वंचित समाजाने भाऊगर्दी नव्हे तर भाईचारा दाखवून लढा द्यायला हवा. फक्त धार्मिक कार्यक्रमापुरते एकत्र येऊन उपयोग नाही, समाजाच्या समस्या सोडवण्यासाठीही ऐक्य महत्त्वाचे आहे.”

कार्यक्रमात बोलताना नवतरुण लेखक तय्यब जफर यांनी युवकांना राजकारणात पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “एका विशिष्ट समाजाचा झेंडा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीत; तिरंगा झेंडा घेऊन मैदानात उतरले, तरच समाजातील समस्या दूर होतील.”

या प्रकाशन सोहळ्यास जेष्ठ उर्दू साहित्यिक असलम मिर्झा अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. इर्तेकाज अफजल, नुरुल हसनैन, प्राचार्य मगदुम फारुकी, मौलाना मोईजोद्दीन फारुकी, इंजि. मोहम्मद वसील, संपादक नायाब अन्सारी, प्रा. काझी नवीद सिद्दीकी, अमित भुईगळ, सिद्धार्थ मोकळे, जावेद कुरेशी, फारुख अहमद, अफसरखान, फिरदौस फातेमा, वाहेद फारुकी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबुबकर रहेबर यांनी केले तर आभारप्रदर्शन जावेद कुरेशी यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यानंतर मुशायराचेही आयोजन करण्यात आले होते.

✍️ महाराष्ट्र वाणी — जनतेच्या मनाचा आवाज!