रिक्षाचालकाने वाचवले महिलेचे प्राण!प्रत्येक माणसाने एक चांगले काम केल्यास बदलू शकतो संपूर्ण शहर!पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचे आवाहन

रिक्षाचालकाने वाचवले महिलेचे प्राण!प्रत्येक माणसाने एक चांगले काम केल्यास बदलू शकतो संपूर्ण शहर!पोलीस आयुक्त प्रविण पवार यांचे आवाहन

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १९ जून 

महावीर चौकात उड्डाणपुलावरून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण एका सजग रिक्षाचालकाच्या तत्परतेमुळे वाचले. रिक्षाचालक आश्रफ शेख यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ कारवाई करत सदर महिलेला घाटी रुग्णालयात दाखल केले आणि तिचा जीव वाचवला.

घटनेच्या वेळेस रिक्षामध्ये प्रवासी असतानाही त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मानवतेला प्राधान्य दिले. रुग्णालयात तिच्या नातेवाईक येईपर्यंत ते स्वतः थांबले. या माणुसकीच्या उदाहरणामुळे पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार यांनी त्यांना पोलीस आयुक्तालयात बोलावून सत्कार केला.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राजगोपाल मालपाणीही उपस्थित होते.

पोलीस आयुक्त श्री. पवार यांनी यानिमित्त जनतेस आवाहन केले आहे की, “प्रत्येक व्यक्तीने जर एक चांगले काम केले तर शहरात २० लाख चांगली कामे होऊ शकतात.” तसेच पुढे सांगितले की, “अशी माणुसकीची उदाहरणे घडवणाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात सत्कार करण्यात येईल. अपघाताच्या वेळी मदत करणाऱ्यांना कोणत्याही कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.”

या उपक्रमाचा उद्देश अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळावी व समाजात मदतीची भावना रुजावी हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.