राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती; सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला

राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती; सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला
राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेश कुमार यांची नियुक्ती; सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ३० जून : – महाराष्ट्र राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळते मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते त्यांनी राज्याचे ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

राजेश कुमार हे १९८८ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी असून, त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६५ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला. इतिहास विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या राजेश कुमार यांनी २५ ऑगस्ट १९८८ रोजी आयएएस सेवेत प्रवेश केला.

 दीर्घ प्रशासकीय अनुभवाची मजबूत पार्श्वभूमी

राजेश कुमार यांनी २४ जुलै १९८९ रोजी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशिव आणि जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.

तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, नाशिकचे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास आयुक्त अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

राजेश कुमार यांनी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग तसेच अलीकडे महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

राज्याच्या प्रशासनात प्रदीर्घ आणि सखोल अनुभव असलेले अधिकारी म्हणून राजेश कुमार यांच्याकडून राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 "राज्याच्या नव्या प्रशासकीय वाटचालीला नवे दिशा आणि गती मिळणार, अशीच अपेक्षा!"