‘मॉडेल शासकीय सोलर जिल्हा’ स्पर्धा जाहीर; विजेत्या जिल्ह्यांना लाखोंची पारितोषिके- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. ११ ऑगस्ट :– केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर, मुफ्त बिजली योजना’ अंतर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाकडून ‘मॉडेल शासकीय सोलर जिल्हा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिली.
या स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ असा ठेवण्यात आला असून, विजेत्या जिल्ह्यांना रोख पारितोषिकांसह गौरव करण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या जिल्ह्यास ५ लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह दिले जाईल. द्वितीय पारितोषिक म्हणून ३ लाख रुपये, तर तृतीय पारितोषिक विजेत्यास १ लाख रुपये प्रदान केले जातील.
पुरस्कार वितरण सोहळा २१ एप्रिल २०२६ रोजी नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित करण्यात येईल. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या योजनेचा उद्देश राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून ऊर्जा बचत साध्य करणे, पर्यावरणपूरक व अक्षय ऊर्जेला चालना देणे हा आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून स्पर्धा अधिक प्रभावी करण्याचे आवाहन ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
शेवटी एकच – सूर्यप्रकाश वाचवा, ऊर्जा बचत वाढवा!