‘मार्टी’ला बळकटी : अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ११ पदांना शासन मंजुरी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. १३
अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था – ‘मार्टी’ साठी ११ नियमित पदांच्या निर्मितीस अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १३ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
राज्यात बार्टी, सारथी व महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय २२ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार आता संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आवश्यक मनुष्यबळास मंजुरी देण्यात आली आहे.
कोणती पदे मंजूर?
मार्टी संस्थेसाठी संचालक, प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी (श्रेणी-२), सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक संशोधन अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक आदी ८ नियमित पदांसह वाहन चालक व शिपाई अशी बाह्य यंत्रणेमार्फत ३ पदे, असे एकूण ११ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
मुख्यालय छत्रपती संभाजीनगरला
या संस्थेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे राहणार असून, सेवाप्रवेश नियम अंतिम होईपर्यंत ही पदे प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. संचालक हे संस्थेचे कार्यालयप्रमुख असतील, तर प्रकल्प अधिकारी (श्रेणी-२) यांच्याकडे आहरण व संवितरण अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अल्पसंख्याक समाजासाठी संशोधन, प्रशिक्षण आणि धोरणात्मक अभ्यासाला चालना मिळणार असून, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचा लढा आता संस्थात्मक बळावर – ‘मार्टी’ ठरणार परिवर्तनाचा केंद्रबिंदू!