बाबा पेट्रोल पंप ते मोंढा नाका दरम्यान २२९ अतिक्रमणे हटवली; न्यायालयाचाही पाठिंबा
उद्या एपीआय कॉर्नरपर्यंत कारवाई; मनपाचे व्यापाऱ्यांना आवाहन
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १० जुलै :मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते मोंढा नाका दरम्यान मोठी कारवाई करत २२९ पक्की व कच्ची अतिक्रमणे हटवली. या कारवाईत हॉटेल्स, दुकाने, शेड्स, कंपाउंड वॉल, जाहिरात फलक, गॅरेज, कमानी इत्यादींचा समावेश होता.
ही मोहीम मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावरून आणि अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत पार पडली.
सुमारे ३५० मनपा अधिकारी-कर्मचारी आणि २५० पोलीस कर्मचारी या कारवाईसाठी तैनात करण्यात आले होते. यासाठी १५ जेसीबी, ४ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब, ५ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने आदी यंत्रणा वापरण्यात आली.
या कारवाईत नगररचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत आदींसह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
उद्या एपीआय कॉर्नरपर्यंत कारवाई; मनपाचे आवाहन
मनपाच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा पुढील टप्पा उद्या (११ जुलै) मोंढा नाका ते एपीआय कॉर्नर या मार्गावर पार पडणार आहे. या भागातील व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमण केलेली मालमत्ता हटवावी, जेणेकरून नुकसान होणार नाही, असे आवाहन संतोष वाहुळे यांनी केले आहे.
हायकोर्टाकडून मोहिमेला मान्यता
बाबा पेट्रोल पंपचे मालक रूमी बाबा प्रिंटर यांनी आपल्या पंपवरील मार्किंगविरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या याचिकेला नकार दिला आणि महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचे कौतुक केले.
अधिक अपडेट्ससाठी वाचत रहा – महाराष्ट्र वाणी!