पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून १० ते १५ अल्पसंख्यांक उमेदवारांना संधी द्या – आजीमभाई शेख व आसिफभाई खान यांची मागणी

पुणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून १० ते १५ अल्पसंख्यांक उमेदवारांना संधी द्या – आजीमभाई शेख व आसिफभाई खान यांची मागणी

महाराष्ट्र वाणी 

पुणे (प्रतिनिधी शंकर जोग) दि २५ :- पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याची ठाम मागणी पुढे आली आहे. पुणे शहरातून शिवसेनेच्या वतीने १० ते १५ अल्पसंख्यांक उमेदवारांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अल्पसंख्यांचे शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आजीमभाई शेख व पुणे शहर अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष आसिफभाई खान यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात त्यांनी पुणे शहर शिवसेना कार्यालय सचिव संदीप शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. पुणे शहरात अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या सात ते आठ लाखांच्या घरात असतानाही शिवसेनेकडून अल्पसंख्यांकांना सातत्याने डावलले जात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शहरातील विविध प्रभागांमध्ये अल्पसंख्यांक समाजाची निर्णायक मते असूनही प्रतिनिधित्व मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेने पुणे शहरातील अल्पसंख्यांक समाजाच्या राजकीय सहभागाकडे गांभीर्याने पाहावे व त्यांच्या न्याय्य हक्काचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पात्र व निष्ठावान १० ते १५ अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

पुण्यातील अल्पसंख्यांकांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्याची ही मागणी शिवसेना नेतृत्व कशी हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.