"नाथसागर तुडुंब; गोदावरीला नवसंजीवनी, पण संभाजीनगर आजही तहानलेलं!"
महाराष्ट्र वाणी न्युज, दि १ ऑगस्ट
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) :- पैठणच्या गोदावरी नदीवरील मराठवाड्याची जीवनरेखा मानला जाणारा नाथसागर धरण यंदा केवळ जुलै महिन्यातच ९० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करण्यात आले आणि २७ दरवाजांपैकी १८ दरवाजे अर्ध्या फूटाने उघडण्यात आले. सध्या धरणातून सुमारे ९,५०० क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. हे केवळ तिसऱ्यांदा घडत आहे, की जुलै महिन्यात दरवाजे उघडावे लागले.
या पाण्याचा प्रवाह पैठणपासून नांदेडपर्यंत सुमारे २५० किलोमीटर अंतरावरील सर्व साखळी बंधारे भरून पुढे थेट तेलंगणापर्यंत पोहोचेल. मराठवाड्याने अनेकदा दुष्काळाचा सामना केला असल्यामुळे नाथसागर धरण भरल्याची बातमी ही संपूर्ण भागातील जनतेसाठी आनंददायक आहे.
मात्र, या समाधानाच्या पार्श्वभूमीवर एक खंत अजूनही टिकून आहे — छत्रपती संभाजीनगर शहराला अजूनही नाथसागरच्या पाण्याचा लाभ पुरेसा मिळालेला नाही. काही ठिकाणी पाईपलाईन असूनही दहा दिवसांतून एकदाच नळाला पाणी येते. तर, अनेक नवीन वसाहतींमध्ये तीन वर्षांपूर्वी पाइप टाकले गेले असले, तरी अद्याप पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. ही बाब इतकी गंभीर आहे की उच्च न्यायालयालाही लक्ष घालावे लागले आहे.
निसर्ग दरवर्षी भरभरून देतोय, आता प्रशासनानेही सर्व नागरिकांची तहान भागवेल, अशीच अपेक्षा पुढच्या वर्षासाठी बाळगूया!
"नाथसागर भरतोय... आता लोकांची घागरही भरली पाहिजे!"