धुळमुक्त शहरासाठी Aurassure-Google चा वायू गुणवत्ता अभ्यास जाहीर; महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल

संभाजीनगरची 'शुद्ध हवा' मोहिम!

धुळमुक्त शहरासाठी Aurassure-Google चा वायू गुणवत्ता अभ्यास जाहीर; महापालिकेचं महत्त्वाचं पाऊल

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ जुलै :- शहराला धुळमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने छत्रपती संभाजीनगर महापालिकेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत Aurassure आणि Google यांच्या सहकार्याने शहरातील वायू गुणवत्ता मोजण्यासाठी गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या अभ्यासाचं ‘श्वेतपत्र’ (White Paper) नुकतंच जाहीर करण्यात आलं.

हा अभ्यास अहवाल महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, सहआयुक्त देविदास टेकाळे आणि उपायुक्त नंदकिशोर भोंबे हे मान्यवर उपस्थित होते.

महापालिका आयुक्त श्रीकांत म्हणाले,

"गेल्या एक वर्षापासून Aurassureच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता नोंदवण्याची जी प्रक्रिया सुरू आहे, ती शहराला धुळमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या डेटावर आधारित अंमलबजावणीद्वारे शहरातील प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळवून देणे हे आमचं उद्दिष्ट आहे."

या अभ्यासात शहरातील विविध ठिकाणी हवेतील PM 2.5, PM 10, NO2, CO2 यांसारख्या प्रदूषकांचे प्रमाण, धूळ नियंत्रणाची गरज आणि रस्त्यांवरील धूळ निर्माण होण्याची प्रमुख ठिकाणं अधोरेखित करण्यात आली आहेत. या डेटावर आधारित उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास शहरात लवकरच वायू गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

महानगरपालिकेच्या वतीने लवकरच ‘धुळमुक्त शहर अभियान’ राबवले जाणार असून त्याअंतर्गत रस्ते धुणे, वाहतूक नियंत्रण, हरित पट्टा वाढवणे, आणि औद्योगिक भागांतील उत्सर्जनावर लक्ष ठेवणे यांसारखे उपाय योजले जाणार आहेत.

 शेवटी ध्येय एकच – शुद्ध हवा, निरोगी शहर!