दरोडा टाकणाऱ्या टोळीवर नागरीकांचा हल्लाबोल; करमाड पोलिसांची शिताफीने दोन दरोडेखोर जेरबंद

दरोडा टाकणाऱ्या टोळीवर नागरीकांचा हल्लाबोल; करमाड पोलिसांची शिताफीने दोन दरोडेखोर जेरबंद
दरोडा टाकणाऱ्या टोळीवर नागरीकांचा हल्लाबोल; करमाड पोलिसांची शिताफीने दोन दरोडेखोर जेरबंद

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ जुलै :– करमाड येथील श्रीनिधी फॅशन या कापड दुकानात मध्यरात्री दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोन अटळ दरोडेखोरांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने करमाड पोलिसांनी शिताफीने पकडले. उर्वरित तिघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

३ जुलै रोजी पहाटे १.२४ वाजता पाच चोरटे दुकानाचे शटर तोडून आत घुसले. दुकान मालक विजय गणेशराव उकर्डे यांनी चोरी सुरू असल्याचे पाहताच तत्काळ परिसरातील नागरिकांना आणि पोलिसांना माहिती दिली. त्यांनी डायल 112 वर कॉल करत सतर्कतेने प्रतिसाद दिला.

चोरट्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताच त्यांनी फिर्यादीस चापट-बुक्यांनी मारहाण केली व गळ्याला चाकू लावून खिशातील २००० रुपये आणि दुकानातील ५०० रुपयांची चिल्लर जबरदस्तीने हिसकावून नेली. परंतु तत्काळ पोलीस आणि जागृत नागरिकांनी पाठलाग करून कृष्णा नारायण भोसले (रा. बेलगाव, ता. नेवासा) व उमेश हरसिंग भोसले (रा. बाभुळखेडा, ता. नेवासा) या दोघांना पकडले. इतर तिघे अंधारात पळून गेले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या अंगझडतीतून २३०० रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेले टॉर्च आणि दोन मोबाईल हस्तगत केले. चौकशीत या आरोपींविरुद्ध नेवासा, सोनई, राहुरी तसेच बीड आणि नाशिक जिल्ह्यांत गंभीर जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले.

सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि दिलीप चौरे करत असून, पुढील तपासासाठी आरोपींना ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी पुजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोह. सुनील गोरे, जयसिंग नांगलोत, सोपान डकले, शिवाजी मदेवाड, तसेच पोकॉ अमोल मारकवाड, विनोद खिल्लारे, संतोष टिमकीकर, शकुल बनकर, रामेश्वर खंडागळे, चापोकॉ गोपीचंद बिघोत यांचा मोलाचा सहभाग होता.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आणखी एक दरोडा अपयशी ठरला!