जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कोर कमिटी बैठक; प्रचार यंत्रणा बळकट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ३ :- जिल्हा परिषद २०२६ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशीव जिल्ह्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.
या बैठकीचे नेतृत्व भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांनी केले. बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकांसाठीची तयारी, प्रचार यंत्रणेचे नियोजन, संघटनात्मक समन्वय तसेच रणनीतीबद्ध कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
भाजपा प्रदेश महामंत्री आमदार मा. श्री. संजयजी केनेकर यांनी निवडणूक तयारीसंदर्भात मार्गदर्शन करताना बूथस्तरावरील व्यवस्थापन, कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चिती, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि जिल्हानिहाय समन्वय यावर विशेष भर दिला. प्रत्येक घटक सक्रिय राहील, अशी सक्षम आणि प्रभावी प्रचार यंत्रणा उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी पक्षाची एकूण राजकीय दिशा, प्रचाराचा सूर आणि संघटनात्मक शिस्त याबाबत मार्गदर्शन करत महायुतीला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निर्णायक विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस मा. मंत्री श्री. अतुल सावे, मा. खासदार डॉ. भागवत कराड, आमदार श्री. नारायण कुचे, आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण, भाजपा प्रदेश महामंत्री आमदार श्री. विक्रांत पाटील, भाजपा प्रदेश महामंत्री श्रीमती माधवी नाईक, तसेच जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे यांची उपस्थिती लाभली.
एकसंघ संघटन, नियोजनबद्ध प्रचार आणि विकासाच्या ठोस अजेंड्यावर आधारित ही बैठक जिल्हा परिषद २०२६ निवडणुकांसाठी भाजपची प्रचार यंत्रणा अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
— विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत भाजप महायुती पुन्हा विश्वासार्ह नेतृत्व सिद्ध करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.