जयंत पाटील यांनी सोडलं नेतृत्व; शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष? राष्ट्रवादीत बदलाची नांदी!

महत्त्वाची बैठक १५ जुलै रोजी होणार असून, त्यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची अधिकृत घोषणा

जयंत पाटील यांनी सोडलं नेतृत्व; शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष? राष्ट्रवादीत बदलाची नांदी!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १२ जुलै :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले असून, त्यांच्या जागी विधान परिषदेतील आमदार आणि पक्षाचे मुख्य प्रतोद शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

या संदर्भात पक्षाची एक महत्त्वाची बैठक १५ जुलै रोजी होणार असून, त्यावेळी नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी यावर्षी ८ फेब्रुवारीपासून प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतली होती. याआधीही ते संयुक्त राष्ट्रवादीच्या काळात याच पदावर कार्यरत होते.

शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझ्या नावाची चर्चा होत आहे, हे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य समजतो. आगामी काळात पक्षवाढीसाठी मेहनत घेणार असून, साताऱ्याचा मुलगा म्हणून महाराष्ट्रात काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न करेन."

दरम्यान, जयंत पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार नसल्याचे एका आमदाराने स्पष्ट केले असून, पक्षाच्या कामकाजात त्यांचे मार्गदर्शन कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. पक्षातील एका मंत्र्याने सांगितले की, वरिष्ठ नेतृत्व बदलाचे निर्णय घेत असते, ही एक नियमित प्रक्रिया आहे. तर दुसऱ्या एका मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, जयंत पाटील यांची अस्वस्थता आणि पक्षात त्यांनी कमी रस दाखवल्यानेच हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगितले आहे.

 नेतृत्वबदलाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात आगामी घडामोडी कशा दिशा घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.