‘जय गुजरात’ घोषणा म्हणजे महाराष्ट्रद्रोह! – आप ने घेतली शिंदेंच्या विधानावर आक्रमक भूमिका

‘जय गुजरात’ घोषणा म्हणजे महाराष्ट्रद्रोह! – आप ने घेतली शिंदेंच्या विधानावर आक्रमक भूमिका

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे दि ४ जुलै :– महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत, म्हणजेच पुण्यात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असा नारा दिला आणि राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विधानावर आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी जोरदार टीका केली असून, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला पायदळी तुडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्तेसाठी लाचारीचं नवं रूप?

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना किर्दत म्हणाले, "सत्तेसाठी खोके-बोकेचं राजकारण करणाऱ्या भाजप आणि शिंदे सेनेने आता ‘जय गुजरात’ च्या घोषणेपर्यंत मजल मारली आहे. एकनाथ शिंदे यांची ही भूमिका म्हणजे सत्तेसाठीची लाचारीचं नवं रूप असून, महाराष्ट्रातील स्वाभिमानाला हा रोख आहे."

हिंदी सक्तीवरून मराठी जनतेत रोष

राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात जनतेत अस्वस्थता आहे. अशा काळात उपमुख्यमंत्र्यांनी गुजरातचा जयघोष करत, मुद्दामहून मराठी जनतेच्या भावना दुखावल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. मुकुंद किर्दत म्हणाले, “हे विधान म्हणजे महाराष्ट्रावर हिंदीचा सांस्कृतिक आणि गुजरातचा आर्थिक बुलडोझर चालवण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे.”

काव्यात्मक प्रतिकार

शिंदेंच्या विधानाला प्रत्युत्तर देताना किर्दत यांनी महाराष्ट्र गीताच्या ओळींचा संदर्भ घेत म्हणाले:

“भीती न आम्हा मुळी तुझी मिंध्यांच्या एकनाथा…

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा!

जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!!”

या शब्दांत त्यांनी शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेला तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंच्या विधानावर सर्वच राजकीय पक्षांतून प्रतिक्रिया उमटत असून, महाराष्ट्रातील अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी काळात हे विधान शिंदेंना अडचणीत आणणार का, याकडे राज्याचे राजकारण डोळे लावून आहे.

 "राज्याच्या मुळावर उठणाऱ्या प्रत्येक घोषणेला आम्ही तोंड देणार – जय महाराष्ट्र!"

 – आम आदमी पक्ष

अधिक अपडेटसाठी वाचत राहा – महाराष्ट्र वाणी!