काँग्रेसची विभागीय आढावा बैठक; स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला गती
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :– आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारीला गती दिली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय आढावा बैठक आज (२५ ऑगस्ट) पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षस्थानी होते.
शिवनेरी लॉन्स येथे झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुका प्रभावीपणे लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करणे, जनतेशी थेट संवाद वाढविणे आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणे या मुद्द्यांवर चर्चा झाली. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षेच्या विषयांवर काँग्रेसने ठाम भूमिका घेत जनतेच्या लढाईत आघाडी घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितले की, “जनतेच्या विश्वासावर आधारित विकासाला प्राधान्य देणे हे काँग्रेसचे ध्येय आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष यश मिळवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने लढण्याचा संकल्प करत संघटनात्मक बळकटीकडे वाटचाल करण्याचे ठरविले.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार कल्याण काळे, आमदार अमित देशमुख, एआयसीसी सचिव कुणाल चौधरी तसेच जिल्हा व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
👉 महाराष्ट्र वाणीवर वाचा महाराष्ट्रातील राजकारण, ग्रामीण-शहरी प्रश्न आणि ताज्या घडामोडी!