कर्जमाफीचा आवाज बुलंद; उद्धव ठाकरे-हर्षवर्धन सपकाळांचा अतिवृष्टीग्रस्त भागांना दौरा!"४७% खरीप हंगाम वाया; उद्धव ठाकरे म्हणाले – कर्जमाफी न दिल्यास आंदोलन!"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २६ :- राज्यातील जवळपास ४७ टक्के खरीप हंगामावर अतिवृष्टीचा घाला बसला आहे. महापुरामुळे पिके उध्वस्त झाली असून घरं उद्ध्वस्त, जनावरे वाहून गेली आहेत. शेतकरी अक्षरशः जीवन-मरणाच्या टप्प्यावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी करत इशारा दिला की, मागणी मान्य न झाल्यास ते शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरणार.
मराठवाड्यातील पुरग्रस्त भागात दौरा करताना ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. "महापुरामुळे झालेलं नुकसान भरून निघणं शक्य नाही. मात्र सरकारने केवळ शेती व पिकांची नाही, तर घरं आणि जनावरांचीही नुकसानभरपाई करावी," अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः मराठवाड्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून केंद्राकडून मोठा निधी जाहीर करण्याची गरज व्यक्त केली.
कळंब तालुक्यातील इटकूर येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकरी, नागरिकांची भेट घेतली. नुकसानीचा आढावा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
कुंभमेळा, शक्तिपीठ निधी शेतकऱ्यांसाठी वळवा – सपकाळ
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. "कुंभमेळा आणि शक्तिपीठासाठी ठेवलेला निधी सध्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, मदतीच्या विषयावर "पैशाचं सोंग आणता येत नाही" असं विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीकाही त्यांनी केली.