आरक्षण महिलांसाठी, पण उपस्थिती पतींची! — सोडत सोहळ्यात महिलांचा शून्य सहभाग
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि १४ :- महिला सक्षमीकरणाचा गाजावाजा होत असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणाच्या आरक्षण सोडतीत काल (दि. 13) एक वेगळीच चित्र दिसून आली. महिलांसाठी तब्बल ५० टक्के आरक्षण असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सोडत प्रक्रियेत एकही महिला उमेदवार उपस्थित नव्हती. मात्र, त्यांचे पती मात्र ‘महिला उमेदवारांचे प्रतिनिधी’ म्हणून आवर्जून उपस्थित होते!
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीच्या सभागृहात पुरुषांचा प्रचंड जमाव दिसत होता. अनेक ठिकाणी आरक्षण महिला वर्गासाठी ठरले तरी त्या जागेची माहिती घेण्यासाठी, अर्ज तपासण्यासाठी आणि उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी महिलांऐवजी त्यांचे पतीच धावपळ करताना दिसले.
स्थानिक पातळीवर ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. “आरक्षण महिलांसाठी आहे, पण कारभार पतीचाच” अशी टीका सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
गेल्या अनेक निवडणुकांत महिला निवडून आल्यावरही खरे निर्णय त्यांच्या पतींच्या हातातच असतात, हा आजवरचा अनुभव पुन्हा एकदा उघड झाला आहे.
महिलांना राजकारणात संधी देणाऱ्या या आरक्षण व्यवस्थेचा हेतू नक्कीच स्तुत्य आहे, पण प्रत्यक्षात सत्तेच्या केंद्रस्थानी महिला केव्हा दिसतील, हा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.
🟣 “आरक्षण महिलांचं, कारभार पतींचा – बदल केव्हा होणार?”