आगामी सण-उत्सवात अन्न तपासणीला गती द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामींचे आदेश

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अन्न विक्रेत्यांवर, हॉटेल्स-रेस्टॉरंट्सवर तसेच शाळा-महाविद्यालय परिसरातील खाद्य स्टॉल्सवर अधिक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत

आगामी सण-उत्सवात अन्न तपासणीला गती द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामींचे आदेश
आगामी सण-उत्सवात अन्न तपासणीला गती द्या – जिल्हाधिकारी दिलीप स्वामींचे आदेश

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ८ जुलै :- सण, व्रत-वैकल्ये आणि यात्रांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिक काटेकोरपणे तपासली जाणार आहे. विशेषतः श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अन्न विक्रेत्यांवर, हॉटेल्स-रेस्टॉरंट्सवर तसेच शाळा-महाविद्यालय परिसरातील खाद्य स्टॉल्सवर अधिक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या अन्न व आरोग्य सल्लागार समितीच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.

यावेळी सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन द.वि. पाटील, डॉ. सारिका लांडगे, डॉ. महेश लड्डा, महिला व बालविकास विभागाचे आर.आर. भिमनवार आदी उपस्थित होते.

 सहा महिन्यांत १५ नमुने असुरक्षित, ४ बनावट

जानेवारी ते जून २०२५ या काळात जिल्ह्यात एकूण २५७ खाद्य नमुने तपासले गेले असून त्यातील १५ नमुने असुरक्षित, तर ४ नमुने बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

दूध व दुग्धजन्य पदार्थांचे ४६ नमुने घेतले, त्यातील ११ नमुने असुरक्षित

पनीरचे १८ नमुने घेतले, त्यातील २ नमुने असुरक्षित

शितपेये, उसाचा रस व बर्फ विक्रेत्यांचे १९ नमुने तपासले गेले, १ नमुना असुरक्षित

आंब्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून अहवाल प्रतीक्षेत

याशिवाय, ३५८ अन्न पदार्थ तपासण्याची कारवाई केली असून ५५४ नमुने सर्व्हेक्षणासाठी घेतले गेले आहेत.

गेल्या सहा महिन्यांत १९ प्रकरणांमध्ये एकूण १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ४५ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

 राज्यात ‘इट राईट इंडिया चॅलेंज’मध्ये जिल्ह्याचा डंका

छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस सुधारणा उपक्रमात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.

‘इट राईट इंडिया चॅलेंज’मध्ये परिमंडळ १ या कार्यालयानेही प्रथम क्रमांक पटकावला आहे.

अंगणवाडी सेविका, अन्न विक्रेत्यांना अन्न सुरक्षा प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश

“पावसाळ्यात अन्न व पाण्यातून विषबाधा व संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. यात्रास्थळे, सण व धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी अन्न तपासणी अधिक कठोरपणे करा. दोषींवर तात्काळ कारवाई करा,” असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्पष्ट केले.

 विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा-महाविद्यालय परिसरातील खाद्य विक्रेत्यांचेही निरीक्षण अनिवार्य

आरोग्यदायी अन्न, सुरक्षित आरोग्य – यातच खरी उत्सवाची चव!