"अतिक्रमणमुक्त रस्त्यांसाठी ५०० कोटींचा निधी मंजूर करा" – आमदार संजय केणेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
"या अतिक्रमणमुक्त रस्त्यांना कायमस्वरूपी सेवा रस्त्यांमध्ये रूपांतरित करणे अत्यंत गरजेचे आहे

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ११ जुलै :- शहरातील अतिक्रमणमुक्त मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करून वाहतूक सुलभ आणि सुरक्षित व्हावी, यासाठी आमदार व विधानपरिषद सदस्य संजय केणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात ११ जुलै रोजी अधिकृत पत्र पाठवले.
या पत्रात केणेकर यांनी नमूद केलं की, संजयनगर, मुकुंदवाडी, पैठण रोड, पडेगाव, दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट, तसेच जळगाव रोडवरील हर्सूल टी पॉईंट ते आंबेडकर चौक या प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. नुकत्याच घडलेल्या एका युवकाच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण हटवण्यात आले.
"या अतिक्रमणमुक्त रस्त्यांना कायमस्वरूपी सेवा रस्त्यांमध्ये रूपांतरित करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत आणि कायदा-सुव्यवस्थाही अबाधित राहील," असे केणेकर यांनी स्पष्ट केले.
बिडकीन-शेंद्रा एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता, शहरावरचा नागरी सुविधांचा ताण वाढणार आहे. यासाठी विकास आराखड्याअंतर्गत तातडीने सिमेंट काँक्रीट सेवा रस्ते तयार करणं आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
शेवटी एकच मागणी – ‘अतिक्रमणमुक्त रस्त्यांना कायमस्वरूपी संरक्षण हवं!’