अवैध, विलंबित जन्म मृत्यू नोंदींबाबत मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन कार्यवाही करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ११ :- अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदी रद्द करुन प्रमाणपत्र परत मिळविण्याबाबत महसूल व वन विभागाने दि.१ डिसेंबर रोजी एका परित्रकाद्वारे मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्याचा अवलंब करुन जिल्ह्यात कार्यवाही करा,असे निर्देश आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आदी उपस्थित होते. तर अन्य उपविभागीय अधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
शासनाने दि.१ डिसेंबर रोजी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम २००० अन्वये कार्यपद्धती ठरविण्यात आली आहे.त्याअंतर्गत अवैध विलंबित जन्म मृत्यू नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्र रद्द करुन परत मिळविण्याबाबत कार्यपद्धती देण्यात आली आहे.या सुचनांचा अवलंब करुन कालबद्ध कार्यक्रम तयार करुन हे काम पूर्ण करण्याची कार्यवाही करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.