अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या पूर्वसंध्येला शासनावर दबाव वाढला! “MRTI तात्काळ सुरू करा” अॅड. वसीम कुरेशी यांची ठाम मागणी
महाराष्ट्र वाणी (खास बातमी)
बुलडाणा (प्रतिनिधी) दि ६ :- अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (MRTI – Minority Research & Training Institute) संदर्भातील शासन निर्णय जाहीर होऊनही प्रत्यक्ष कामकाज सुरू न झाल्यामुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याची तीव्र नाराजी MRTI कृती समिती महाराष्ट्रचे सरचिटणीस अॅड. वसीम कुरेशी यांनी व्यक्त केली आहे.
18 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा केला जात असून, त्याच पार्श्वभूमीवर MRTI तात्काळ कार्यान्वित करण्याची मागणी शासनाकडे जोरदारपणे करण्यात आली आहे.
अॅड. कुरेशी म्हणाले —
“शासन निर्णय असूनही MRTI प्रत्यक्ष सुरू झाले नसल्याने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वसतिगृह सुविधा व शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ मिळत नाही. MRTI सुरू झाल्यास शैक्षणिक असमानता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.”
ते पुढे म्हणाले —
“अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून शासनाने MRTI सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्था तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू करावी.”
राज्यातील विविध अल्पसंख्यांक संघटना, विद्यार्थी, पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनीही ही मागणी जोरदारपणे पुढे आणली असून, शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुख्य मुद्दे :
MRTI तात्काळ सुरू करण्याची मागणी तीव्र
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण व शिष्यवृत्तीपासून वंचितपणा
अल्पसंख्यांक हक्क दिनीच MRTI सुरू करण्याची शक्यता व्यक्त
👉 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आता निर्णयाचीच प्रतीक्षा!