अकरावी प्रवेश प्रक्रियेचं सुधारित वेळापत्रक जाहीर; आजच पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार!

अकरावी प्रवेश प्रक्रियेचं सुधारित वेळापत्रक जाहीर; आजच पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, २८ जून (प्रतिनिधी) :- राज्यभरात सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आज महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. शिक्षण संचालनालयाने सुधारित वेळापत्रक जाहीर करताच, पहिली गुणवत्ता यादी शनिवार, २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना सोमवारपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

सुरुवातीला, ही गुणवत्ता यादी २६ जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांमुळे तांत्रिक पातळीवर काही बदल आवश्यक ठरले. त्यामुळे ही यादी पुढे ढकलून ३० जूनला जाहीर होईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र आता, दोन दिवस आधीच सुधारित यादी घोषित करण्यात येत आहे, हे विशेष!

शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार:

गुणवत्ता यादी: २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता

प्रवेश कालावधी (पहिली फेरी): ३० जून ते ७ जुलै

रिक्त जागांची यादी (दुसरी फेरी): ९ जुलै रोजी

या प्रवेश प्रक्रियेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरणार असून, यंदा प्रथमच राज्यात संपूर्ण अकरावी प्रवेश प्रणाली पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे.

 "गुणवत्ता यादीसाठी थांबलेले सारे विद्यार्थी – आज संध्याकाळी मिळणार त्यांच्या मेहनतीला पहिली संधी!"