सोशल मीडियावर ‘डॉन’गिरीचा नाद; पिस्तूल तस्करीचे जाळे उघड, सहा तरुण अटकेत

सोशल मीडियावर ‘डॉन’गिरीचा नाद; पिस्तूल तस्करीचे जाळे उघड, सहा तरुण अटकेत
सोशल मीडियावर ‘डॉन’गिरीचा नाद; पिस्तूल तस्करीचे जाळे उघड, सहा तरुण अटकेत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रतिमा निर्माण करण्याची हौस आणि ‘डॉन’ बनण्याच्या आकर्षणातून काही तरुण पिस्तूल तस्करीत सहभागी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून त्यांची विक्री करणाऱ्या कथित टोळीचा पर्दाफाश केला आहे. रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत राबविण्यात आलेल्या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चार पिस्तुले आणि ११ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

एका पिस्तुलाच्या माहितीवरून तपासाला दिशा

मोंढा परिसरात एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे आणि पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितावर लक्ष ठेवले. गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजता एका हॉटेलमधून बाहेर पडलेल्या शिवा अंबादास सुरे (२५, रा. सुरेवाडी, जाधववाडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आढळले.

चौकशीदरम्यान हे पिस्तूल सत्यम चाटे आणि अर्जुन लिंगायत यांच्याकडून ४२ हजार रुपयांना घेतल्याचे सुरेने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या धाग्याच्या आधारे तपास पुढे नेत पोलिसांनी कथित तस्करीच्या साखळीतील इतर संशयितांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली.

टेलिग्राम ग्रुपवरून शस्त्रांची खरेदी-विक्री?

पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीचा शस्त्रव्यवहार टेलिग्रामवरील एका ग्रुपच्या माध्यमातून केला जात होता. मध्य प्रदेशातील उज्जैन, झारवडा आणि उकरटी परिसरातून पिस्तुले आणली जात असल्याचा संशय आहे. शस्त्रांचे फोटो ग्रुपवर पाठवून उपलब्धतेची माहिती दिली जात असे आणि त्यानंतर संभाव्य ग्राहकांपर्यंत पिस्तुले पोहोचवली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

मध्य प्रदेशातून सुमारे ३८ हजार ते ७० हजार रुपयांपर्यंत किंमतीत पिस्तुले खरेदी करून त्यांची पुढे विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यवहारात मध्यस्थांना १० ते २० हजार रुपयांपर्यंत कमिशन मिळत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शस्त्रे घरात लपवून ठेवणाऱ्या व्यक्तीलाही मोबदला दिला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

घरातील टाकीपासून झाडाखालील खड्ड्यापर्यंत शस्त्रे लपवली

सुरेच्या चौकशीत आणखी एक पिस्तूल त्याचा मित्र सुमित सुनील विसपुते याच्या घरी लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी विसपुतेच्या घराची झडती घेत लोखंडी टाकीत लपवलेले पिस्तूल जप्त केले.

पुढील तपासात मयूरपार्क परिसरातून सत्यम चाटे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडेही पिस्तूल आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर अर्जुन लिंगायत याने मोंढा परिसरात झाडाखाली खड्डा करून आणखी दोन पिस्तुले लपवल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संबंधित ठिकाणी शोध घेत ही दोन्ही पिस्तुले जप्त केली.

काडतुसे कुणाकडे आहेत, याचा तपास करत पोलिसांनी श्रीकांत शिखरे आणि विशाल भोसले यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ जिवंत काडतुसे मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग

या प्रकरणातील आरोपी एकमेकांच्या परिचयातील असून, त्यांच्यापैकी काही जण अमली पदार्थांच्या किंवा इतर नशेच्या आहारी गेल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपींपैकी काही जण उच्चशिक्षित आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा सुरे हा बी.एस्सी. उत्तीर्ण असून कंत्राटदार म्हणून काम करतो. सुमित विसपुते हा बायो-इन्फॉर्मेटिक्स पदवीधर असून खासगी कंपनीत नोकरी करतो. सत्यम चाटे हा बी.कॉमच्या तृतीय वर्षात, तर अर्जुन लिंगायत हा बी.सी.एस.च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. श्रीकांत शिखरे हा बी.सी.एस. पदवीधर असून विशाल भोसले याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे.

या तरुणांनी आर्थिक फायद्यासाठी शस्त्रांची तस्करी केली की गुन्हेगारी जगतात आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने हा मार्ग स्वीकारला, याचा तपास सुरू आहे. यातील काही आरोपींवर यापूर्वीही मारहाण, फसवणूक आणि इतर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने सहाही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बंटी दीक्षित हत्याकांडाशी संबंध आहे का?

काही दिवसांपूर्वी झालेल्या बंटी दीक्षित हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या हत्याकांडातील संशयित हल्लेखोर पवन पराशर याच्याकडून यापूर्वी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.

सिडको पोलिसांनी या टोळीकडून जप्त केलेल्या चार पिस्तुलांची रचना आणि धाटणी पवन पराशर याच्याकडून मिळालेल्या पिस्तुलाशी मिळतीजुळती असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आल्याची माहिती आहे. त्यामुळे हत्याकांडातील शस्त्राचा पुरवठा या टोळीकडून झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या दोन्ही प्रकरणांतील संबंध अद्याप तपासातून निश्चित झालेला नाही.

पोलीस पथकाला एक लाखांचे बक्षीस

पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर तसेच पोलीस अंमलदार मंगेश पवार, सहदेव साळवे, अमोल अंभोरे, नरेश भोंडे आणि अतुल सोळंके यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या कारवाईचे कौतुक करत पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी संबंधित पथकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित