सोयाबीन-कापूस भिजतायत; पावसाचा मुक्काम आणखी वाढणार

महाराष्ट्रात हवामान पुन्हा बिघडले; अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय

सोयाबीन-कापूस भिजतायत; पावसाचा मुक्काम आणखी वाढणार

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि २७ :- महाराष्ट्रात परत एकदा हवामानाने पलटी मारली असून अनेक भागांत सलग मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. अनियमित पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. वेचणीसाठी आलेला सोयाबीन, कापूस, मका याचबरोबर आलेला कांदा, टोमॅटो आणि भाजीपाला पावसात भिजून नुकसानग्रस्त झाला आहे. रायगडमध्ये भातकापणी ठप्प झाली असून पुणे जिल्ह्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे हा पाऊस सक्रिय राहील. ऑक्टोबर अखेरपर्यंत हवामान कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैर्ऋत्येकडे सरकले असून पुढील 24 तासांत हे पूर्व-मध्य भागातून पुढे सरकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र किनारपट्टीसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जास्त जाणवेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हवामान कोरडे होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यात रिमझिमचा खेळ

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रविवारी दिवसभर रिमझिम स्वरूपातील पाऊस झाला. सायंकाळी काही भागांत सरींचा जोर वाढला. कुलाबा वेधशाळेत 8.30 सकाळपासून 5.30 संध्याकाळपर्यंत 14.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ येथे 6.6 मिमी पाऊस झाला.

किनारपट्टीवर इशारा – मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश

पश्चिम किनाऱ्यावर वारे तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खाते व भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना पुढील 48 तास समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 35 ते 45 किमी तर काही ठिकाणी 55 किमी प्रतितास पोहोचू शकतो असे सांगण्यात आले आहे.

तापमानात घट – नागरिकांना थोडा दिलासा

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत तापमान 3 ते 5 अंशांनी घसरले आहे. अकोला, बुलढाणा, गोंदिया आणि यवतमाळ येथे रविवारी कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले गेले.

रायगड आणि कोकणात ‘यलो अलर्ट’

रायगड जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून 30 ऑक्टोबरपर्यंत कोकणासह रायगडला 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत.

पर्यटन व्यवसायावर परिणाम

दिवाळी सुट्यांमध्ये रायगड आणि कोकण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. मात्र, बदलत्या हवामानामुळे पर्यटनावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पर्यटन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. खराब हवामानामुळे गेटवे ऑफ इंडियाहून मांडवा जाणारी जलवाहतूक सेवा देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

राज्यातील हवामानाचा हा अनिश्चित खेळ किती दिवस चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.