सिल्लोडमध्ये ‘कापूस ते कापड’ उद्योगसाखळीची तयारी; अब्दुल सत्तारांच्या पुढाकारातून सूतगिरणीची पाहणी
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि २० :- सिल्लोड तालुक्यात कापूस प्रक्रिया उद्योगाला चालना देत स्थानिक पातळीवर कापूस ते कापड अशी उद्योगसाखळी विकसित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून माजी उद्योग संचालक डॉ. जे. के. जाधव यांनी सहकाऱ्यांसह सिल्लोड येथील नॅशनल सहकारी सूतगिरणीला सदिच्छा भेट देत पाहणी केली.
गेल्या आठवड्यात येवला येथे पैठणी उद्योगाची पाहणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी डॉ. जाधव यांना सिल्लोड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी सूतगिरणीला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी सिल्लोडमध्ये पैठणी उद्योग उभारण्याची शक्यता, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि कापूस प्रक्रिया ते कापड निर्मितीपर्यंतची उद्योगसाखळी उभारणे, या विषयांवर चर्चा करण्यात आली.
डॉ. जे. के. जाधव यांचा उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि मार्गदर्शन सिल्लोडमध्ये वस्त्रोद्योगाच्या विस्तारासाठी उपयोगी ठरू शकते, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्थानिक शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, कापूस आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आणि परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या उद्देशाने सिल्लोडमध्ये वस्त्रोद्योगाच्या नव्या शक्यतांचा शोध घेतला जात आहे.