सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या; 12 लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त

सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या; 12 लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त
सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या; 12 लाखांच्या 14 मोटारसायकली जप्त

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :-    

छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत चाललेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात गुन्हेशाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले असून, सराईत मोटारसायकल चोराकडून तब्बल 12 लाख रुपये किमतीच्या 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे व त्यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती संकलित केली. त्यानुसार कृष्णा नारायण मुरडकर (वय 27, रा. वालसांवगी, भोकरदन, जि. जालना) हा इसम छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल व सिडको पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी गोडंखेड, ता. जामनेर, जि. जळगाव येथे सापळा रचून आरोपी कृष्णा मुरडकर व त्याचा साथीदार अरुण धनराज कांडेलकर (वय 19, रा. गोडंखेड, जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान दोघांकडून विविध गुन्ह्यांतील 14 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

जप्त केलेल्या दुचाकी या हर्सुल व सिडको पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असून, संबंधित प्रकरणांमध्ये कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हे नोंद आहेत. जप्त वाहनांमध्ये Honda Shine, HF Deluxe, Honda Unicorn, Bajaj Pulsar 220 आदी दुचाकींचा समावेश आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींना पोलीस ठाणे हर्सुल, गुन्हा र. नं. 305/2025 अंतर्गत तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पचार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स.पो.नि. रविकांत गच्चे, स.फौ. दिलीप मोदी, पोह. प्रकाश गायकवाड, पोह. अशरफ सय्यद, पोह. अमोल शिंदे व पोअ. सोमनाथ हुकळे यांनी सहभाग घेतला.

शहरातील दुचाकी चोरट्यांसाठी ही कारवाई इशारा ठरत असून, गुन्हेशाखेची धडाकेबाज कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.