“शिक्षण केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नसून समाजाशी जोडणंही तितकंच महत्त्वाचं आहे” – मिर्झा अब्दुल कय्युम नदवी
🌿‘स्टेपर्स सेवा’ अभियान : नन्ह्या मुलांच्या हातून समाजासाठी १५० ठिकाणी सेवा कार्य
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :– स्टेपिंग स्टोन्स स्कूल तर्फे हाती घेतलेल्या ‘स्टेपर्स सेवा’ या अनोख्या सामाजिक अभियानाने शहरात नवा आदर्श निर्माण केला आहे. शाळेचे ट्रस्टी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागातून तब्बल १५० ठिकाणी १५० सेवा उपक्रम राबविण्यात आले.
या मोहिमेतून विद्यार्थ्यांनी झोपडपट्टी, गरिब वस्त्या, वृद्धाश्रम, रुग्णालये अशा ठिकाणी जाऊन सेवा कार्य केले. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी पाणी बचत, वृक्षारोपण आणि परिसर स्वच्छता यांसारखे उपक्रमही पार पाडले.
शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या अभियानाचे उद्घाटन मंजीत कॉटन प्रा. लि. चे अध्यक्ष बी.एस. राजपाल यांनी केले. शाळेचे अध्यक्ष अब्दुल हुसैन, कार्यकारी संचालक नसीम रहीम, संचालक ज़ईम रहीम, व्यवस्थापन सदस्य सैफुद्दीन अब्बास आदी मान्यवरांसह प्राचार्य संदीप मालू उपस्थित होते.
या अभियानाला उपस्थित राहून शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले की, “हे केवळ शालेय प्रकल्प नसून, विद्यार्थ्यांमध्ये करुणा, परोपकार, सहानुभूती आणि हमदर्दी यांसारख्या मानवी मूल्यांचा संस्कार करण्याची खरी सामाजिक चळवळ आहे.”
शिक्षण क्षेत्रातील ही सामाजिक चळवळ पाहून शहरातील नागरिकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ‘स्टेपर्स सेवा’ हे जबाबदार, दयाळू आणि संवेदनशील नागरिक घडविण्याचा मार्ग आहे, असा सूर अनेकांनी व्यक्त केला.
👉 ‘स्टेपर्स सेवा’ : लहानग्यांच्या छोट्या हातातून उभी राहिली मोठी सामाजिक चळवळ!