शहरवासीयांनो सावधान! पाण्याचा अपव्यय महागात पडणार; २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हाही!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ५ :
यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरवासीयांना पाणी बचतीचे आवाहन करत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.
पाणी भरल्यानंतर नळ तात्काळ बंद करावा, पाणी रस्त्यावर, नालीमध्ये किंवा इतर ठिकाणी वाहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या नळांना योग्य तोटी बसवावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत गळतीची कामे पूर्ण करा
घरगुती नळ जोडणी, नळाच्या तोट्या तसेच अंतर्गत जलवाहिनीतील गळती किंवा आवश्यक दुरुस्तीची सर्व कामे १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यानंतर पाण्याची गळती किंवा पाण्याचा अपव्यय आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पहिल्यांदा – ₹५,००० दंड
दुसऱ्यांदा – ₹१०,००० दंड
तिसऱ्यांदा – ₹२५,००० दंड
त्यानंतर आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
पाणी खेचण्यासाठी मोटार वापरू नका
ज्या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत आहे, अशा ठिकाणी महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून थेट पाणी खेचण्यासाठी विद्युत मोटार अथवा पंपाचा वापर करू नये, असेही मनपाने स्पष्ट केले आहे.
अनधिकृत नळ जोडणी असल्यास ती तातडीने अधिकृत करून घ्यावी. महानगरपालिकेच्या जलवाहिनीमध्ये परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.
रस्त्यावर गाडी किंवा घरासमोरील रस्ता धुणे टाळा
रस्त्यावर वाहने धुणे, घरासमोरील रस्ता पाण्याने धुणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय करणे टाळावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईसोबतच आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मनपाने कळविले आहे.
“पाणी ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेस नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित