“वेळ बदलाची!” राष्ट्रवादीचा विकास जाहीरनामा; आमदार सतीश चव्हाणांचा विकासाचा ठाम निर्धार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून, त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा “विकासाचा जाहीरनामा” आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांशी सखोल संवाद साधत आगामी विकासाचा आराखडा मांडण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर हे राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या 30 वर्षांत शहराचा अपेक्षित विकास न झाल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. पाणीटंचाई, खराब रस्ते, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत समस्या आजही कायम असल्याचे वास्तव समोर ठेवत, या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार जाहीरनाम्यातून मांडण्यात आला आहे.
विकासाच्या जाहीरनाम्यात शहरवासीयांना 24 तास स्वच्छ पाणीपुरवठा, अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण व वाहतूक सुधारणा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, पर्यटन विकास, शहर बस सेवा, सार्वजनिक शौचालयांची उभारणी, अतिक्रमण कारवाईत नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई, सिडकोवासियांना मालकीहक्क, मनपा स्मार्ट स्कूल, सातारा देवळाई गुंठेवारी प्रश्नाचे निराकरण, झोपडपट्टी विकास, नशेखोरीविरोधी कठोर कारवाई, शहर सौंदर्यीकरण, क्रीडांगण व मैदानांचा विकास, तसेच पे अँड पार्क सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जातीपाती व धर्माच्या राजकारणामुळे शहराच्या विकासाची चाकं अडथळ्यात सापडली असल्याचा आरोप करत, ‘वेळ बदलाची’ ही टॅगलाईन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस जनतेसमोर जात असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदार घड्याळाला मतदान करून बदल घडवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
👉 यावेळी शहर विकासासाठी मतदार काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.