“लॉटरी लागली”च्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; ७० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन भामटा फरार

“लॉटरी लागली”च्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; ७० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन भामटा फरार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- शहरात भामट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. “तुम्हाला मोठी लॉटरी लागली आहे,” असे आमिष दाखवत एका अज्ञात भामट्याने ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः ज्येष्ठांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुबाई दगडुशेट वाणी (वय ६५, रा. बजरंग चौक, एन-७) या मंगळवारी सकाळी आपल्या कामासाठी घराबाहेर पडल्या होत्या. महाराष्ट्र बँकेजवळील पेरकर निवास परिसरातून त्या पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी संवाद साधला.

सुरुवातीला आरोपीने अतिशय नम्रपणे बोलत, “आई, तुमच्या नावावर ६० हजार रुपयांची लॉटरी लागली आहे,” असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. अचानक मिळालेल्या या बातमीमुळे महिला काहीशा गोंधळल्या; मात्र आरोपीने सतत गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले.

यानंतर “पुढील प्रक्रिया करायची आहे,” असे सांगत आरोपीने महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवण्यास सांगितले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून इंदुबाई यांनी सुमारे ३० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवल्या.

भामट्याने त्यानंतर महिलेला दुचाकीवर बसवून जाधववाडी परिसरातील सनी सेंटर परिसरात नेले. वाटेत तो सतत “काळजी करू नका, पैसे लगेच मिळतील,” असे सांगत महिलेला विश्वासात घेत होता. पुढे शेख क्लिनिक परिसरात थांबल्यानंतर आरोपीने “बांगड्यांचे वजन करून येतो,” असे सांगत त्या हातात घेतल्या आणि काही क्षणांतच तेथून फरार झाला.

बराच वेळ आरोपी परत न आल्याने इंदुबाई यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना माहिती देत सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या घटनेत सुमारे ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पवार या प्रकरणाचा तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. संशयिताच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

⚠️ नागरिकांनी सावध राहावे!

अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या “लॉटरी”, “बक्षीस” किंवा “सरकारी मदत” अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

“गोड बोलून विश्वास जिंकणारे भामटे पुन्हा रस्त्यावर; सावध राहा, अन्यथा पुढचा नंबर तुमचाही असू शकतो!”