रोहित पठारे मृत्यू प्रकरणाचा तपास आता SIT कडे; मुख्य आरोपीसह सर्व २३ आरोपी अटकेत!
दोषारोपपत्रासाठी पोलिसांची वेगवान तयारी; विशेष सरकारी अभियोक्त्याच्या नियुक्तीसाठी शासनाकडे मागणी
वैजापूर दि १५ :- वैजापूर येथील रोहित अनिल पठारे मृत्यू प्रकरणाचा तपास अधिक व्यापक, निष्पक्ष आणि प्रभावी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली असून, या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सर्व २३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या खटल्याची न्यायालयीन लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता वेग आला आहे.
वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०१/२०२६ अन्वये ४ नोव्हेंबर २०२६ रोजी रोहित अनिल पठारे यांच्या मृत्यूप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीपासूनच तपासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने SIT स्थापन
या प्रकरणाचा तपास अधिक सखोल आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली हे पथक काम करीत आहे.
या पथकामध्ये वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक देविदास मुपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिवसने आणि पोलीस उपनिरीक्षक मनीषा जगताप यांचा समावेश आहे.
घटनेशी संबंधित पुरावे, साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक पुरावे, घटनाक्रम आणि आरोपींमधील परस्पर संबंधांची कसून पडताळणी केली जात आहे. तपासातील कोणतीही महत्त्वाची बाब दुर्लक्षित राहू नये, यासाठी SIT विशेष दक्षता घेत आहे.
मुख्य आरोपीसह २३ जणांना बेड्या; एक बालक ताब्यात
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांच्या विविध पथकांनी अहोरात्र मेहनत घेतली. विविध जिल्ह्यांमध्ये छापेमारी करून आरोपींना शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २३ आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) सागर राजूसिंग राजपूत
२) सुमित बळीराम राजपूत
३) किरणसिंग ऊर्फ जयदेव किशोरसिंग राजपूत
४) नितीन पोपट होंड
५) सुजित सुरेशसिंग राजपूत (ठाकूर)
६) पंकज बाबूसिंग राजपूत
७) मयूर बाबासाहेब राहणे
८) प्रमोद ज्ञानेश्वर वाघचौरे
९) लोकेश ऊर्फ सोनू गब्बरसिंग राजपूत (चोर)
१०) अमन सत्यपाल उंटवाल
११) गज्जू ऊर्फ गजेंद्र राजूसिंग राजपूत
१२) अमर मदनसिंग राजपूत
१३) शंकर ऊर्फ प्रतीक राजू राजपूत
१४) क्रिश प्रितमसिंग राजपूत
१५) आनंद संतोष मथुरे ऊर्फ राजपूत
१६) अनिकेत ऊर्फ अविनाश पोपट होंड
१७) प्रतीक कैलास साळुंके
१८) ज्ञानेश्वर सिताराम वडळकर
१९) रोहित मच्छिंद्र आहेर
२०) संकेत अजिनाथ आहेर
२१) तुषार आदिनाथ आहेर
२२) हर्षद अशोकसिंग राजपूत
२३) सचिन रामदास कडे
याशिवाय एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण २४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या यादीत सुजित राजपूत यांच्या नावाची FIR मध्ये पुनरावृत्ती झालेली आहे.
विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती होणार?
या प्रकरणातील न्यायालयीन लढाई प्रभावीपणे लढता यावी, यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्याची मागणी शासनस्तरावर करण्यात आली आहे. विशेष सरकारी अभियोक्त्याच्या माध्यमातून न्यायालयात पुरावे आणि कायदेशीर बाजू प्रभावीपणे मांडता यावी, तसेच खटल्याचे कामकाज जलदगतीने पार पडावे, हा यामागील उद्देश आहे.
तपासातील आवश्यक बाबी पूर्ण करून शक्य तितक्या लवकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यावर पोलिसांचा भर आहे. न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध झाल्यास संबंधित आरोपींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, या दृष्टीने तपास आणि अभियोग पक्षाची तयारी केली जात आहे.
आरोपींची SIT मार्फत कसून चौकशी
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला असून, SIT मार्फत त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.
वैजापूरमध्ये शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. १४ नोव्हेंबर रोजी वैजापूर येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक आणि सुमारे १०० ते १५० नागरिक उपस्थित होते.
बैठकीत शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
एकीकडे सर्व आरोपींना अटक, दुसरीकडे SIT मार्फत तपास आणि विशेष सरकारी अभियोक्त्याच्या नियुक्तीसाठी शासनाकडे मागणी, अशा पद्धतीने रोहित पठारे मृत्यू प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. आता या तपासातून कोणते महत्त्वाचे पुरावे समोर येतात आणि न्यायालयीन प्रक्रियेत काय निष्पन्न होते, याकडे वैजापूरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित