“रेल्वेत तब्बल 1.20 लाख नोकरभरती! रेल्वे मंत्र्यांची संसदेत मोठी घोषणा”

“रेल्वेत तब्बल 1.20 लाख नोकरभरती! रेल्वे मंत्र्यांची संसदेत मोठी घोषणा”

महाराष्ट्र वाणी 

नवी दिल्ली दि ६ :- देशभरातील तरुणांना रेल्वे सेवेत करिअर करण्याची मोठी इच्छा असते. अशा लाखो उमेदवारांसाठी रेल्वेमधील भरतीविषयी एक महत्त्वाची माहिती जाहीर झाली आहे. हिवाळी अधिवेशनात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2024 आणि 2025 या दोन वर्षांत मिळून 1 लाख 20 हजार 579 पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे.

1,20,579 पदांची मोठी भरती सुरू

मागील दोन वर्षांत रेल्वेकडून मोठ्या भरतींसाठी अनेक अधिसूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये रेल्वेने 10 महत्त्वाच्या भरती अधिसूचना प्रसिद्ध केल्या असून त्यामध्ये 91,116 पदांचा समावेश आहे. तर 2025 मध्ये आतापर्यंत 7 भरती अधिसूचना जारी झाल्या असून, दोन्ही वर्षांचा एकत्रित आकडा 1,20,579 पदांपर्यंत पोहोचतो.

कोणत्या पदांसाठी भरती?

रेल्वेकडून विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात खालील प्रमुख पदांचा समावेश आहे:

सहाय्यक लोको पायलट (ALP)

टेक्निशिअन

RPF मध्ये उपनिरीक्षक व कॉन्स्टेबल

जूनिअर इंजिनिअर (JE)

डिपो मटेरियल सुपरिटेंडंट

केमिकल आणि मेटलर्जिक असिस्टंट

पॅरामेडिकल स्टाफ

NTPC मधील विविध पदे

मिनिस्टीरिअल आणि आयसोलेटेड कॅटेगरी

लेव्हल-1 मधील ट्रॅक मेंटेनर व सहाय्यक पदे

यावेळी भरतीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं असून त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल व उमेदवारांना तयारी सहज करता येईल, असे रेल्वे मंत्री म्हणाले.

मागील भरतींचा आढावा

रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, 2004–2014 या कालावधीत सुमारे 4 लाख उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळाली. तर 2014 नंतर ते प्रमाण वाढून 5 लाख 8 हजारांपर्यंत पोहोचले. आगामी काळातही रिक्त पदं तातडीने भरण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.