राजकीय भूकंपाचे संकेत? महाराष्ट्रात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, ८ मंत्र्यांना नारळ देण्याची शक्यता!

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २५ जुलै :- महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथी घडण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता असून, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, सत्ताधारी गटांत खळबळ उडाली आहे. या फेरबदलातून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातील काही मंत्र्यांची मंत्रीपद गमावण्याची दाट शक्यता आहे.
वादग्रस्त वर्तन आणि निष्क्रीय कामगिरी ठरणार घातक?
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर काही मंत्री सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं आणि आचाराने चर्चेत राहिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या १०० दिवसांच्या कामकाजाच्या आढाव्यात काहींची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्यामुळेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरणार आहे.
कोणत्या गटात किती मंत्री धोक्यात?
शिंदे गट: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नावे चर्चेत आहेत.
अजित पवार गट: धनंजय मुंडेंचा आधीच राजीनामा झाला आहे. आता माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्या मंत्रिपदावरही टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
भाजप: मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या नियोजनानुसार बाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते.
याशिवाय, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद देऊन त्यांच्याजागी भाजपचे नाराज नेते सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याचीही शक्यता आहे.
या साऱ्या घडामोडींचा परिणाम कोणत्या गटावर अधिक होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र इतकं नक्की की, येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
राजकीय हालचालींचा तपशीलवार आढावा घेण्यासाठी आम्ही पुढेही तुमच्यासोबत राहू…