“युद्धाच्या छायेतून खासदार कल्याण काळे सहपरिवार सुरक्षित भारतात; दानवेंच्या टोमण्यांना ‘धुळवडीचे बोल’ म्हणत प्रत्युत्तर!”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.६ :- दुबईमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे सहपरिवार सुरक्षितपणे भारतात परतले आहेत. दुबईसह काही मध्यपूर्व देशांमध्ये तणाव वाढल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांमध्ये मोठी भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
काही दिवसांपासून मध्यपूर्वेत वाढलेल्या संघर्षामुळे विमानसेवा, हालचाली आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत खासदार काळे कुटुंबीयांसह सुरक्षित परतल्याने त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी टोमणा मारत “युद्ध सुरू असताना कल्याण काळे दुबईच्या राजाला भेटायला गेले होते का?” असा सवाल उपस्थित केला होता. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार काळे यांनी अप्रत्यक्षपणे दानवेंना टोला लगावत, “धुळवडीच्या दिवशी लोक काहीही बोलतात” असे म्हणत उत्तर दिले.
राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काळे समर्थकांनी दानवेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, युद्धजन्य तणावामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने सतत लक्ष ठेवावे, अशी मागणीही काही सामाजिक संघटनांनी केली आहे.
— संकटातून सुरक्षित परतलेले खासदार, आणि त्यावर रंगलेली राजकीय टीका… संभाजीनगरच्या राजकारणात या प्रकरणाची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.